महाराष्ट्र

नवनीत राणांचा गंभीर आरोप; हत्या प्रकरण दाबण्यामागे…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 July :- उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी पोलीस अधिकारी आणि पत्रकारांवर दबाव आणल्याचा धक्कादायक आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी आम्ही गृहमंत्रालयाकडे याची तक्रार केल्यानंतर अमरावती पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचेही राणा यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची आरती सिंग यांचीही चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली आहे.

“हे प्रकरण दाबण्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे. यासाठी त्यांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या आहेत. जेंव्हा एनआयएची टीम अमरावतीत पोहोचली, तेव्हा १२ दिवसांनी आरती सिंग यांनी मान्य केले, की उमेश यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या संदर्भात केलेल्या पोस्टमुळे झाली,” अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी कारवाईला उशीर का केला, यासंदर्भातही त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

उमेश कोल्हे हत्याप्रकरणी सहा फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तर सातवा आरोप नागपूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नागपूरमधून सातव्या आरोपीला अटक केली आहे. शेख इरफान शेख रहिम (३२, कमेला ग्राऊंड, अमरावती) असे नागपूरहून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.