महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचे मेहुणे पाटणकरांना दिलासा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 July :- राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मनी लॉड्रिंग व फसवणूक प्रकरणात सीबीआय कोर्टाने मोठा दिलासा आहे. तब्बल 84.6 कोटींच्या या गैरव्यवहार प्रकरणी पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधातील तपास बंद करावा, असा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने विशेष सीबीआय कोर्टात सादर केला होता. हा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला आहे. म्हणजेच या प्रकरणी तपास थांबवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे धाकटे भाऊ आहेत. ते गृहनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असून त्यांची साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून पाटणकरांनी मनी लॉड्रिंग केल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, नंदकिशोर चर्तुवेदी यांच्या हमसफर डिलर या कंपनीने पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते. मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचा ईडीचा आरोप आहे. या पैशातूनच ठाण्यात गृहनिर्मिती प्रकल्प राबवण्यात आल्याचा आरोप करत ईडीने 2017 मध्ये पाटणकरांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पाटणकर यांच्या कंपनीच्या 11 सदनिकाही इडीने जप्त केल्या आहेत.

पाटणकर यांच्याविरोधातील मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडी व सीबीआय या दोन्ही केंद्रीय संस्था तपास करत आहेत. विशेष म्हणजे सीबीआयने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला इडीने विरोध केला आहे. तर, या प्रकरणात पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे आढळले नाहीत, असे कारण देत सीबीआयने यापूर्वी 2020 मध्येही कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. मात्र, न्यायालयाने तेव्हा हा रिपोर्ट फेटाळून लावला होता. 2 वर्षांनंतर सीबीआयने पुन्हा क्लोजर रिपोर्ट सादर केल्याने कोर्टाने तो स्वीकारला आहे. मात्र, इडीने या रिपोर्टला विरोध केला असून पाटणकर यांच्याविरोधात इडीचा तपास सुरुच राहणार आहे.

श्रीधर पाटणकर हे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे असल्याने ठाकरेंवर दबाव टाकण्यासाठीच त्यांच्याविरोधात प्रकरण उकरुन काढल्याचा आरोप यापूर्वी शिवसेनेने केला आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये विरोधकांना धमकावण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनाही तपास यंत्रणांच्या रडारवर घेतले जात आहे. पाटणकरांवरील आरोप हा त्याचाच एक प्रकार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपने हे सर्व दावे फेटाळून लावले आहे. गैरव्यवहार केला नसेल तर चौकशांना का घाबरता, असा सवाल करत तपास यंत्रणांच्या कारवायांमध्ये पक्ष कोणताही हस्तक्षेप करत नाही, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.