राजपाल यादववर फसवणुकीचा आरोप!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
2 July :- अभिनेता राजपाल यादव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘भूल भुलैया-2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसले होते. पण, आता राजपाल यादव वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. राजपाल यादववर 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशच्या इंदूर पोलिसांनी याप्रकरणी राजपाल यादवविरोधात नोटीस जारी केली आहे.
वृत्तानुसार, या नोटीसमध्ये राजपाल यादवला 15 दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरिंदर सिंग नावाच्या बिल्डरने राजपाल यादवविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्या मुलाला फिल्म इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी राजपालने 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप बिल्डरने केला आहे. पण, अभिनेत्याने पैसे घेतले आणि मुलाला इंडस्ट्रीत लाँच करण्यासाठी कोणतीही मदत केली नाही, असे सुरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.
बिल्डरने सांगितल्यानुसार, जेव्हा ते राजपालकडे त्यांचे पैसे परत मागण्यासाठी गेले तेव्हा तो गायब झाला होता. एवढेच नाही तर राजपालने त्यांचे फोन उचलणेही बंद केले. पैसे परत न मिळाल्याने नाराज झालेल्या बिल्डरने इंदूरमधील तुकोगंज पोलिस ठाण्यात राजपाल यादवविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी नोटीस जारी करून राजपाल यादवला 15 दिवसांत पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.
राजपाल यादववर पैसे न दिल्याने गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2010 मध्ये राजपालविरोधात एका व्यक्तीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. राजपाल ‘अता-पता लापता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होता. हा चित्रपट बनवण्यासाठी त्याने एका व्यक्तीकडून 5 कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते.
यानंतर जेव्हा राजपालने त्या व्यक्तीचे पैसे परत दिले नाही तेव्हा ती व्यक्ती अभिनेत्याच्या विरोधात कोर्टात पोहोचला होती. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना सांगितले की, राजपाल कर्ज देणाऱ्या व्यक्तीला व्याजासह 10 कोटी 40 लाख रुपये परत देईल. पण, कोर्टाने फटकारल्यानंतरही राजपालने त्या व्यक्तीचे पैसे परत दिले नाहीत. अभिनेत्याने चेक दिला होता, पण तोही बाऊन्स झाला होता. यानंतर न्यायालयाने राजपालला तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. मात्र, नंतर या प्रकरणात अभिनेत्याला जामीन मिळाला होता.