महाराष्ट्र

मोठी बातमी! शिंदे गटातील सर्व आमदार मुंबईत दाखल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 July :- बंडखोरी केल्यानंतर तब्बल 11 दिवसांनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात भाजप आणि शिंदे गटाची बैठक होणार आहे. गोव्याहून हे आमदार मुंबईकडे निघाले होते. सूरत, गुवाहाटी, गोवा मार्गे हे सर्व आमदार आता मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप नेते प्रसाद लाड हे सर्व आमदारांना हॉटेलपर्यंत घेऊन जाणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर विमानतळ ते हॉटेलपर्यंत कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 जुलै रोजी बहुमत सिद्ध करायचे आहे. तत्पूर्वी उद्या 3 जुलै रोजी राज्य विधानसभेचे दोनदिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे अ‌ॅक्शन मोड आले आहेत. आज पहाटे 4 वाजताच ते गोव्यात दाखल झाले आहेत. पणजी येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामास असलेल्या आपल्या 50 समर्थक आमदारांसोबत ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे शिवसेनेचे बंडखोर व अपक्ष असे 50 आमदार गेल्या 3 दिवसांपासून गोव्यात आहेत. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 4 जुलै रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह आजच मुंबईत परतण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजता बंडखोर आमदारांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे. यात मंत्रीपद वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार गेल्याने शिवसेनेत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे या बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले आहे. त्यामुळे मुंबईतील आक्रमक शिवसैनिक मवाळ झाल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्रिपद आता शिवसेनेच्या बंडखोर गटाकडे गेल्याने विधानसभा अध्यक्षपद आपोआप भाजपकडे आले आहे. रविवार, 3 जुलै रोजी विशेष अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होणार आहे. भाजपने मूळचे शिवसेनेचे पण सध्या सेनेचे कट्टर विरोधक असलेले व कायद्याचे जाणकार म्हणून ओळख असलेले दक्षिण मुंबईतील कुलाब्याचे भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदासाठी निवड केली आहे. मुख्यमंत्री निवडीत जसा भाजप नेतृत्वाने धक्का दिला तसाच धक्का अध्यक्ष निवडीत दिला आहे. राहुल नार्वेकर हे आजपर्यंतचे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरणार आहेत.