महाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकार किती दिवस टिकणार? जयंत पाटलांचं मोठं विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

1 July :- राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णा लावण्यात आली. गुरुवारी सायंकाळी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला.

यानंतर आता महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष संपल्याची चिन्हे दिसत आहेत. शिदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन अद्याप २४ तासही उलटले नाहीत, तोपर्यंत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले की, “भारतीय जनता पक्षालाही माहीत आहे, की हा प्रासंगिक करार आहे.

हे सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. मला तर वाटतंय २०२४ आधीच निवडणुका होतील, त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे, भारतीय जनता पक्ष ठरवेल,” असंही पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे हे गुरुवारी दुपारी गोव्यातून मुंबईत परतले. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. त्यावेळी फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आणि रात्री शपथ घेणार, असेच चित्र होते. राज्यपालांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मात्र एकनाथ शिंदे हे रात्री मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे जाहीर केले. त्यावेळी नाट्यमय घडामोडींचा पहिला अंक पाहायला मिळाला. आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण सरकार योग्यपणे चालेल ही जबाबदारी माझी असेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

राजभवनात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असतानाच नाट्यमय घडामोडींचा दुसरा अंक घडला. फडणवीस यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी सहभागी व्हावे, असा पक्षाचा आदेश असल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फडणवीस हे नव्या सरकारमध्ये सहभागी होतील, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. त्यानंतर थोड्याच वेळात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.