News

अपघातातील जखमी तरुणांवर रुग्णालयांत झाला नाही उपचार, अखेर तडफडत सोडला प्राण!

बीड जिल्हा रुग्णालय आणखी एका घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे.

बीड, 6 जून: बीड जिल्हा रुग्णालय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. जिल्हा रुग्णालय शनिवारी आणखी एका घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले. अपघातातील दोन जखमी तरुणांवर रुग्णालयात आणण्यात आलं. मात्र, त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्यानं दोघांना तडफडत तडफडत प्राण सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी (4 जून) गढी गावाजवळ जीप आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातातील दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. तरुणावर नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने बीडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. मात्र, या रुग्णांवर एकाही डॉक्टरने उपचार केले नाहीत. धक्कादायक म्हणजे रुग्णांना बेडवर नाही तर चक्क जमिनीवर झोपू घातलं. दोन्ही रुग्ण वेदनेने अक्षरश: तडफडत होते. तरीदेखील एकही डॉक्टर किंवा कर्मचारी या रुग्णांच्या मदतीला धावून आला नाही. घटना गुरुवारी रात्रीची आहे. रुग्ण तडफडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दोघांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

गणेश देशमुख आणि सचिन भोसले असं मृत तरुणांची नावं होती. दोघेही माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी होते. जिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गणेश आणि सचिनचा मृत्यू झाला आहे. दोघांवर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचे प्राण वाचले असते, असं दोघांच्या नातेवाईकांनी म्हणलं आहे.  या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं आहे.