महाराष्ट्र

शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री! फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Jun :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही शपथ दिली. या सोहळ्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून रंगलेल्या राज्यातल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शपथविधी सोहळ्यात शिंदे समर्थकांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, हा बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्राच्या सर्व घटकाला न्याय देण्याचे काम करू. सर्वांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन काम करेन. आता देवेंद्र फडणवीस सुद्धा सोबत आहेत. या साऱ्यांच्या साथीने विकासाचा गाढा हाकेन.

केंद्रीय मंत्री नितीन यांनी ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली व आपल्या दोघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करो, या सदिच्छा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @mieknathshinde जी यांचे तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन व दोघांनाही यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा.