शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि. 29 जून :- औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील असे नाव करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकडून नामांतराचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी जुनी होती. 1988 मध्ये औरंगाबादेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवल्याची घोषणा केली. तेव्हापासून शिवसैनिक औरंगाबादला संभाजीनगर म्हणत. तर शिवसेनेकडून उस्मानाबादचे नाव धाराशीव ठेवा अशी होती. शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव केला जायचा.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी जून 1995 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत ठराव मंजूर झाला. तो राज्य सरकारकडे पाठवला. त्यावेळी राज्यात युतीचे सरकार होते. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर 1996 मध्ये सरकारने संभाजीनगर नावावर आक्षेप आणि सूचना मागवणारी अधिसूचना काढली. या अधिसूचनेलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. या काळात आघाडी सरकार आले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही अधिसूचना मागे घेतली. औरंगाबाद महापालिकेत 2010 मध्ये शिवसेना-भाजप सत्तेत आले. त्यांनी 2011 मध्ये पुन्हा औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारडे पाठवला. मात्र, काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर 2015, 2017 मध्ये नामांतराची मागणी झाली.
नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. खरे तर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, या निर्णायाला विरोध करत स्थानिकांनी दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी केली. त्यासाठी स्थापन झालेल्या कृती समितीने मानवी साखळी करून आंदोलन केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.