राजकारणमहाराष्ट्र

अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर राजकीय हालचालींना वेग

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

दि. 28 जून :- महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी भाजपा कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे ३० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दिल्लीतील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस नुकतेच मुंबईत दाखल झाले आहेत. यानंतर ते राज्यातील इतर नेत्यांसोबत बैठक घेत आहेत. एकनाथ शिंदे बंडखोरी प्रकरणावरून भाजपाच्या बैठकांचं सत्र वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बंडखोरी प्रकरणावर भाजपाकडून अद्याप कोणतीही पाऊल उचललं नाही. दरम्यान भाजपाच्या बैठका घेण्याचं प्रमाण वाढल्याने नेमकी कोणती रणनीती आखली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईत आगमन होताच ते इतर सर्व भाजपा नेत्यांसोबत राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि धनंजय महाडिक हे नेतेही त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीत अमित शाह आणि नड्डांची भेट घेतल्यानंतर भाजपा नेते आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजपाच्या गोटात राजकीय हालचाली वाढल्याने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नेमकं कोणतं वळण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.