भारत

मुकेश अंबानींनी दिला राजीनामा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Jun :- जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असणारे मुकेश अंबानी आपले 16 लाख कोटी रुपयांहून अधिकचे साम्राज्य नव्या पीढीकडे सोपवण्याची तयारी करत आहेत. धीरुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या वाटणीवरुन मुकेश यांचा त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासोबत मोठा वाद झाला होता. अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारी रिलायंस जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र आकाश अंबानी यांची जिओच्या बोर्डाच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीला संचालक मंडळानेही मंजुरी दिली आहे.

मुकेश अंबानी यांनी गत डिसेंबर महिन्यात कंपनीच्या नेतृत्व बदलावर भाष्य केले होते. ‘मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आणावे लागेल,’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर जिओची कमान नव्या पिढीकडे सोपवण्यात येईल, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. आता ही गोष्ट प्रत्यक्षात आली आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजचा पाया धीरुभाई अंबानी यांनी रचला होता. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातच्या सौराष्ट्रमधील जुनागड जिल्ह्यात झाला होता. त्यांनी व्यवसायात पाऊल टाकले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता किंवा बँक बॅलन्स नव्हते. त्यांचे 1955 मध्ये कोकिळाबेन यांच्याशी लग्न झाले. त्यांना मुकेश व अनिल ही 2 मुले, तर दीप्ती व नीना या 2 मुली आहेत. 6 जुलै 2002 रोजी धीरुभाई यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या संपतीच्या वाटणीत पत्नी कोकिळाबेन यांची मुख्य भूमिका पार पडली होती.