शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका; उद्या होणार सुनावणी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
26 Jun :- शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ४० बंडखोर आमदारांची परतण्याची शक्यता मावळल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना नव्याने पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच १६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या गटानेदेखील आक्रमक भूमिका घेऊन न्यायालयात धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शविला आहे.
शिंदे गटाने दाखल केलेल्या या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. याच मागणीची दखल घेत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी या १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली असून कारवाई का करु नये याबाबत उत्तर देण्यास सांगितले आहे.
शिवसेनेने आपला गटनेता बदलून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना नियुक्त केले आहे. याविरोधातच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच याचिका दाखल करत या दोन्ही निर्णयांना विरोध केला आहे. याबाबत उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळ आता न्यायालय काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.