उद्धव ठाकरे गहिवरले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
24 Jun :- एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला जबर हादरा बसला आहे. शिंदेंनी सेना आमदारांचा एक मोठा गट फोडत गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये डेरा टाकला आहे. या अभूतपूर्व स्थितीमुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थिती हाताळताना उद्धव ठाकरे यांना मोठा घाम गाळावा लागत आहे. याची प्रचिती शुक्रवारी आली.
उद्धव यांना शुक्रवारी VC द्वारे शिवसैनिकांशी संवाद साधताना अक्षरशः गहिवरुन आले. त्यांचा कंठ दाटून आला. ते म्हणाले – ‘मला मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही. केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून माझ्या मागे येऊ नका. मी पक्ष चालवण्यास नालायक असेल तर खुशाल तिकडे जा.’ त्यांच्या या विधानावर शिवसैनिकांनी सेनेच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
उद्धव म्हणाले – ‘आपल्या नशिबी अनेकदा पराभव आला. पण, त्याने काहीच फरक पडला नाही. हारजित मानण्यावर अवलंबून असते. पराभवानंतरही जिंकण्यासाठी जनता साथ देते. मी बुडालो तर माझ्यासोबत निष्ठावंत सेनाही बुडेल.”सध्या शिवसेनेचा पहिला नारळ फुटला तशी स्थिती आहे. मी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येकावर विश्वास ठेवेल. तुम्हाला तिकडे भविष्य दिसत असेल तर खुशाल तिकडे जा.
मी थांबवणार नाही. प्रत्येकाला स्वतःचे भविष्य सुधारण्याचा अधिकार आहे. मी कुणालाही थांबवणार नाही. तुम्हाला पक्ष सांभाळण्यास मी नालायक वाटत असेल तर तुम्ही खुशाल तिकडे जा. तसे स्पष्ट सांगा. मी आनंदाने हे पद सोडेल,’ असे उद्धव म्हणाले. यावेळी त्यांचा कंठ चांगलाच दाटून आला होता.
‘मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडल्यानंतर मला अनेकांचे फोन आले. वर्षा सोडल्यानंतर अनेकांचे मला फोन आले. तुम्ही वर्षा निवासस्थान सोडायला नको होते, असे अनेकजण मला म्हणाले. मी मोह सोडला. जिद्द सोडली नाही,’ असेही उद्धव यावेळी शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले.
‘माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद गौण आहे. मी तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करत नाही. बाळासाहेबांचा फोटो माझ्या मागे लागला म्हणून तुम्ही माझ्या मोहात अडकू नका. माझ्या प्रेमात अडकू नका. केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करुन निर्णय घ्या. बाकी मला काहीही बोलायचे नाही. . शिवसेना पुढे नेण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. शिवसेना बाळासाहेबांचे लाडके अपत्य होते. ते त्यांना माझ्यापेक्षाही प्रिय होते,’ असेही ते यावेळी म्हणाले.