महाराष्ट्र

शिवसेनेला मोठा धक्का! जळगावचा बडा नेता गुवाहाटीला पोहोचला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Jun :- शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सध्या आसाममध्ये गुवाहाटी येथे आहेत. शिवसेनेचे ३० पेक्षा जास्त तर काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे म्हटले जात आहे. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचा शासकीय वर्षा बंगलादेखील त्यांनी सोडला आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जाताना दिसत आहेत. वृत्तानुसार जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील हेदेखील गुवाहाटीला पोहोचले आहेत. तेही बंडखोर आमदारांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे जळगावचे बडे नेते तथा आमदार गुलाबराव पाटील हेदेखील आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीमधील रेनिसन्स या हॉटेलकडे जाताना त्यांना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांनी कैद केलं आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील हेदेखील आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदारांमध्ये सामील झाल्याचे म्हटले जात आहे. पाटील यांच्यासोबतच आगामी काळात आणखी चार आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे.

याआधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोर आमदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी भावनिक होत आपली भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच, “ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रिपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रिपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.