Breaking news; महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
दि.22 जून:- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्री पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या बैठखीत मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. या साऱ्या घडामोडींच्या संदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.
गुवाहटीत एकनाथ शिंदेसह उपस्थित सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीतही शिंदे गट हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारांसाठी ते रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटीत 42 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊन जात आहोत.”
ते पुढे म्हणाले की, सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करणार आहोत. म्हणून, बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्र आले आहेत. सध्या आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे. माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जेने ते माझ्यासोबत आले आहेत.