महाराष्ट्र

महाविकास आघाडीची विजयासाठी पुन्हा रंगीत तालिम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 Jun :- राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर हार पत्कराव्या लागलेल्या सत्ताधारी महाविकास आघाडी आता विधान परिषद निवडणुकीत राजकीय इभ्रत वाचवण्यासाठी कसून तयारी करीत आहे. उद्या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी हाॅटेल ट्रायडंटमध्ये बैठक घेतली गेली. या बैठकीला राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचे नेते आणि आमदार होते तर दुसरीकडे भाजपनेही त्यांच्या आमदारांना व्हिप बजावला आहे, त्यामुळे राज्यसभेपेक्षाही विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.

ट्रायडेंटमध्ये कांग्रेस नेत्यांची अजित पवारांसोबतची बैठक संपली असून सुमारे एक तास ही बैठक चालली. या बैठकीत आमदारांना उभय नेत्यांनी मार्गदर्शन केले असून भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीनेही त्यांच्या आमदारांना व्हिप जारी केला अशी माहिती आहे. या बैठकीनंतर कांग्रेस नेते मुंख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अतिरिक्त मते मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशिल असून यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट काँग्रेस नेते घेत आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आमदारांना व्हिप जारी केला असून आज सायंकाळी झालेल्या बैठकीत मतदान कसे करायचे याबाबत पक्षाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रचंड आत्मविश्वास भाजप आमदारांत दिसून आला. त्यांनी बैठकीतच विजयाची जोरदार नारेबाजी लावली. भाजप असो की, महाविकास आघाडी दोन्ही बाजुने अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या भेटी-गाठी सुरू असून त्यांची मनधरणी सुरु आहे.

राज्यसभा निवडणुकीत मोठा फटका बसला याची सल महाविकास आघाडीला असून ते निवडणुकीसाठी अधिक खबरदारी घेताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थित बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच आमदार उपस्थित होते.

आमचे सर्व उमेदवार जिंकतील असा विश्वास काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विश्वास व्यक्त केला आहे. एकत्र पद्धतीने आम्ही नियोजन करत आहोत. मित्र पक्षही आमच्या सोबत आहेत. पसंतीक्रमांकाच्या मतांबाबत बैठकीत चर्चा झाली असून त्यानुसार आम्ही मतदान करणार आहोत, महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील. मुख्यमंत्र्यांसोबत झाल्यास ती नियोजनाबाबत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी हार पत्करल्यानंतर शिवसेनेने पराजयातून अधिक काळजी घेतली आहे. सुहास कांदे यांचे मत बाद झाल्यानंतर शिवसेनेने अशा गोष्टी टाळण्यासाठी शिवसेना आणि अपक्ष आमदारांसाठी आज मतदानाची रंगीत तालीम घेतली गेली. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह महत्वाचे शिवसेना नेते उपस्थित होते.

आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांची मते पदरात पाडून घेण्यासाठी मविआ आणि भाजपकडून प्रयत्न केले जात आहे. परंतू हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले की, मी माझ्या 30 वर्षाच्या कारर्किर्दीत मतदानासाठी हॅाटेलमध्ये राहीलो नाही. मी जे बोलतो ते करतो, कारण तसे मी ठरवले तर सगळ्यांना फसवू शकलो असतो; पण मी फसवाफसवीचे राजकारण करत नाही. अमेरिकेत असलेले क्षितीज ठाकूर मतदानाला येणार की नाही याची शाश्वती मी देऊ शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुधीर मुनगुंटीवार म्हणाले की, एकदा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात तर दुसऱ्यांदा नारायण राणे यांच्या नेतृत्वात अशा दोन वेळा शिवसेना फुटली आहे. भारतीय जनता पक्षात असे कधीच झाले नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले भाष्य हास्यास्पद आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना फुटली स्वतःच्या कुटुंबातले सख्खे चुलत भाऊ फुटले, त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना असे वाक्य वापरण्याचा अधिकार नाही असेही मुनगुंटीवार म्हणाले.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. भाजपकडून पाच उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीकडून सहा उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक रंगतदार झाली आहे. दोन्ही बाजुने विजयाचे दावे करण्यात येत आहेत.