पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सरकारचे मोठे पाऊल
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 Jun :- पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्यांसोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.