भारत

फारुख अब्दुल्लांची राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Jun :- जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. यामुळे मुस्लिम चेहरा पुढे करुन सत्ताधारी NDA ला आव्हान देण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या विरोधकांना जबर धक्का बसला आहे. अब्दुल्ला म्हणाले – ‘माझी आजही जम्मू काश्मीरला गरज आहे. कलम – 370 रद्द झाल्यानंतर खोऱ्यातील स्थिती बिघडली आहे. आता तिथे निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे माझे तिथे असणे गरजेचे आहे. संयुक्त विरोधक जो उमेदवार देतील त्याला आमचा पूर्ण ताकदीने पाठिंबा असेल.’

माजी मुख्यमंत्री म्हणाले -विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदासाठी माझे नाव प्रस्तावित केल्यामुळे माझा गौरव झाला आहे. बैठकीत ममता बॅनर्जींनी माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर अनेक नेत्यांनी मला फोन करुन पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली.

15 जून रोजी दिल्लीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची एक बैठक झाली होती. त्यात शरद पवार, फारुख अब्दुल्ला व गोपाल गांधी यांच्या नावावर एकमत झाले होते. पवारांनी बैठकीनंतर लगेचच आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर बहुतांश विरोधी पक्षांनी अब्दुल्लांच्या नावावर तयारी दर्शविली होती.

ममता बॅनर्जींच्या बैठकीत काँग्रेस, शिवसेना, भाकप, माकप, भाकप-एमएल, पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी, जेडीएस, आरएसपी, आययूएमएल, राष्ट्रीय लोकदल व झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते सहभागी झाले होते. या प्रकरणी येत्या 20-21 तारखेला पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 18 जुलै रोजी संपुष्टात येणार आहे. घटनात्मक तरतुदींनुसार, विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच नव्या राष्ट्रपतींची निवड प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानुसार, येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक व त्यानंतर 21 जुलै रोजी निकाल जारी होणार आहे.