महाराष्ट्र

शिवसेनेतील मतभेदांबाबत राऊतांचा खुलासा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

18 Jun :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पक्षात बंडाळी माजल्याचे वृत्त जोरकसपणे फेटाळून लावले आहे. “शिवसेनेत कधीच अंतर्गत मतभेद होत नाहीत. मतभेद न होणारा हा एकमेव पक्ष आहे. कोणी यासंबंधीच्या अफवा पसरवत असेल, तर त्याला सेनेचे अंतरंगच कळले नाहीत,” असे ते म्हणालेत. शिवसेनेच्या उद्याच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापन सोहळ्याला राजकीय दृष्ट्या महत्व असते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतचा प्रत्येक वर्धापन दिन हा महाराष्ट्राला दिशा देत असतो. म्हणून उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे, असे संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा आणि सध्याची राज्यातील परिस्थितीवर उद्या उद्धव ठाकरे काय भाष्य करतील याकडे सर्वांचे लक्ष असल्याचेही त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, शिवसेना एकमेव पक्ष आहे. ज्या पक्षात अंतर्गत मतभेद होत नाही आणि होणार नाहीत. जर आशा प्रकारच्या अफवा कोणी पसरवत असेल तर त्यांना शिवसेनेचे अंतरंग कळालेच नाहीत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांचा वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येक पक्षांनी आपली रणनीती ठरवलेली आहे. वेगवेगळ्या हॉटेलमध्ये असले तरी महाविकास आघाडी एकत्र आहे आणि एकत्र राहील. तसेच अपक्षही आमच्याबरोबर आहेत. आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये ठेवण्यात येत असल्याचे राऊतांनी सांगितले.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. मतांची फोडाफोड टाळण्यासाठी सारेच पक्ष दक्ष आहेत. शिवसेनेचे आमदार पवईतील वेस्ट इन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार ट्रायडंटमध्ये थांबले आहेत. काँग्रेसने आपल्या आमदारांचा मुक्काम फोर सीझन्समध्ये ठेवला आहे.