भारत

दूरदर्शनचा आवाज गेला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 जून :- नमस्कार, संध्याकाळचे सात वाजतायत. मी प्रदीप भिडे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर…अशी शब्दफेक आपल्या दमदार आवाजात करून महाराष्ट्राच्या मनामनात दूरदर्शनच्या काळापासून घर निर्माण करणारे सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज दि.7 जून मंगळवार रोजी वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात टीव्ही मीडियात त्यांनी आपली अमीट मुद्रा उमटवली. अशी माहिती सह्याद्री वाहिनीने त्यांच्या ट्वीटर हॅंडलवरुन अधिकृतरित्या दिली आहे. प्रदीप भिडे यांनी आपल्या बहारदार आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात 40 वर्षे अधिराज्य केले. मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 रोजी झाली. प्रदीप भिडे एप्रिल 1974 पासून दूरदर्शनमधे दाखल झाले. त्यावेळी भक्ती बर्वे-इनामदार, ज्योत्स्ना किरपेकर, स्मिता पाटील-बब्बर हे सारे प्रदीप भिडे यांचे समकालीन तसेच सम-व्यावसायिक सहकारी होते.

प्रदीप भिडे यांना नाटकाची देखील पार्श्वभूमी आहे. रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केले होते. स्वत:च्या आवाजावर त्यांनी आर्थिक प्राप्ती करण्याच्या निर्णय घेतला आणि खरा ठरवला. भिडे यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती , माहितीपट आणि लघुपट यांना आवाज दिला असून दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन केले आहे. ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली. पुढे त्यांनी या क्षेत्रात जम बसवला आणि स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करून जाहिराती माहितीपट आणि लघुपट यावर आपला आवाज ठसविला.