क्राईमबीड

संप्पत्तीसाठी भावाने केला बहिणीवर कोयत्याने हल्ला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 जून :- घरातील जमीनीच्या वादावरून संतापलेल्या भावाने नायब तहसीलदार असलेल्या बहिणीवर कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास केज तहसीलमध्ये घडली. जखमी नायब तहसीलदार आशा वाघ (गायकवाड) यांना केज येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर हल्लेखोर भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केज येथे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या आशा वाघ गायकवाड यांचे आणि त्यांचा भाऊ मधु वाघ यांच्यात जमीनीचा वाद सुरू आहे. मधु याने गेल्या काही दिवसांपूर्वी आशा यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी पदरात पाडून घेतल्याची तक्रारही केली होती. मात्र त्यांच्या तक्रारीत तेव्हा तथ्य आढळून आले नव्हते. या दोघांचा वाद हा न्यायदरबारीही असल्याचे सांगण्यात येते. आज सकाळी नायब तहसीलदार आशा वाघ या तहसीलमध्ये कार्यरत असताना दुपारी बारा ते सव्वा बाराच्या सुमारास त्यांचा भाऊ मधु वाघ हा त्या ठिकाणी आला. दोघात शाब्दीक वाद झाला. त्यावेळी मधु वाघ याने आपल्या सोबत आणलेल्या कोयत्याने नायब तहसीलदार आशा यांच्यावर सपासप वार केले. तीन वार डोक्यात लागले तर अन्य एक ते दोन वार अन्य शरीरावर लागल्याने यात नायब तहसीलदार या गंभीर जखमी झाल्या. तहसील कार्यालयात अचानक गोंधळ आणि आरडाओरड सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांसह इतरांनी हल्लेखोर मधु यास कार्यालयातील एका रुममध्ये कोंडून ठेवले तर जखमी आशा यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचार केल्यानंतर नायब तहसीलदार यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. इकडे पोलिसांनी मधु वाघ यास ताब्यात घेतले आहे. या घटनेने केजमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.