क्राईमबीड

पत्नीने पतीचा मोबाईल पाहिला आणि…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 जून :- पत्नीशिवाय दुसऱ्या महिलेशी असलेले अफेअर चॅटींगच्या माध्यमातून मोबाईलमध्ये बंद होते परंतू पत्नीने झोपलेल्या नवऱ्याचा अंगठा लावून मोबाईचे लॉक उघडल्यानंतर पतीचे अफेअर उघडे पडले आणि मग यातूनच झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी कि, बीड तालुक्यातील रंजेगाव येथे घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. दिनेश पांडूरंग आबुज (वय ३५) आणि ज्योती दिनेश आबुज (वय ३०) हे पती पत्नी आपल्या आठ वर्ष आणि पाच वर्ष वय असलेल्या मुलगा आणि मुलगी सोबत रंजेगाव येथे राहत होते. यातील दिनेश याचे बाहेर काहीतरी चालू आहे याची भनक दिनेशची पत्नी ज्योतीला लागलेली होती असे असताना शनिवारी मध्यरात्री ज्योती हिने मोबाईलचे लॉक उघडण्यासाठी दिनेशचा अंगठा वापरून मोबाईलचे लॉक उघडले. याच मोबाईलमध्ये लातूर येथील एका मॉलच्या नावे सेव केलेल्या नंबरवरील व्हॉट्सअॅपवर गेल्यानंतर त्यात ज्योतीला दिनेश याचे दुसऱ्या महिलेशी अफेअर असल्याचे लक्षात आले. यावरूनच रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास दोघा पती, पत्नीमध्ये भांडण सुरू झाले हे कडाक्याचे भांडण सुरू असताना दिनेश याने पत्नी ज्योतीचा गळा दाबल्याने तिचा मृत्यु झाला. पत्नी ज्योती मयत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिनेशने बचावासाठी दरोड्याचा बनाव आखला. घरातून बाहेर येत गेटला स्वतःला बांधून घेण्याचा प्रयत्न करत त्याने आरडा ओरडा केल्याने लोक जमा झाले. केवळ दरोड्याचाच बनाव नव्हे तर अत्याचार झाला आहे हे दाखविण्यासाठी देखील दिनेशने काही गोष्टी केल्या होत्या . झटापटीत अस्तव्यस्त झालेली साडी आणि ब्लाउझचे तुटलेले बटन यामुळे अत्याचार होत असताना प्रतिकार केल्यामुळे ज्योतीचा खुन केला हे निदर्शनास यावे म्हणून या बाबी दिनेशने केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेमुळे पहाटेपासूनच रंजेगावमध्ये खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर बीड येथुन डिवाएसपी वाळके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि एलसीबीचे प्रमुख रंजेगावमध्ये दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आणि दिनेशशी चर्चा करून अंदाज बांधल्यानंतर पोलिसांना संशय आला व दिनेश याला सकाळीच ताब्यात घेवून चौकशीला सुरूवात केली. या चौकशीत दिनेश याने आपणच पत्नी ज्योती हिचा खून केला असल्याचे कबूल केले असल्या संदर्भात पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.