कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने सचिवांच्या सूचना
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 जून :- राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. रुग्णालय, महाविद्यालय, कॉलेज, शाळा, रेल्वे, बस, सिनेमागृह आणि सभागृहात मास्क वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे गरजेचे आहे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी जिल्हा आणि नागरी अधिकाऱ्यांना कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार सूचना देऊनही राज्यातील चाचण्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. 1 जूनच्या आकडेवारीनुसार, 26 जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या साप्ताहिक चाचण्यांच्या संख्येत मोठी कमतरता आहे. ही चिंतेची बाब असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण चाचण्यांचे प्रमाण तत्काळ वाढवावे, असे पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रासह तेलंगाणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत कोरोना रुग्ण वाढत आहे. या राज्यात एका हजारांहून अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याची समोर येत आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य खात्याच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.