महाराष्ट्र

भोंग्यांचा कायमचा निकाल लावा! राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Jun :- मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला कायमचे संपवायचे आहे. त्यात जराही कुचराई नको, कामाला लागा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. हे पत्र लोकांपर्यंत पोहचवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, अशी सुरुवात असलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलेच नव्हे तर देशातले राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझे एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचे आहे. माझे पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचे आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या आवाजाची सांगितलेली मर्यादा लोकवस्ती असलेल्या भागासाठी म्हणजे तुम्ही-आम्ही राहतो त्या परिसरासाठी जास्तीत जास्त ४५ ते ५५ डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सरचा आवाज) इतकी आहे. तुमच्या घराजवळच्या लाऊडस्पीकरचा आवाज इतकाच असला पाहिजे. जिथे जिथे या नियमाचे पालन होत नसेल तिथे तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलीसांना कळवावे.

लक्षात असू द्या की, तुम्ही जेव्हा अशा प्रकारची गोष्ट पोलिसांना कळवता तेव्हा तम्ही लाऊडस्पीकरशी संबंथित लोकांविरोधात तक्रार करत नसता किंवा गुन्हा दाखल करत नसता. तुम्ही फक्त कळवत असता आणि संबंधितांवर राज्यशासनाच्या (State) वतीने पोलीस गुन्हा दाखल करत असतात आणि पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी पोलिसांचीच असते. तुम्ही कळवल्यानंतरही पोलिसांकडून कायद्याचे पालन झाले नाही तर संबंधित पोलीस अधिकान्यावर न्यायालयाचा अवमान (Contempt of court) केल्याचा ठपका लागू शकतो.


लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करू पोलिसांना सतत माहिती देऊ शकता. पोलिसांना टिटर आणि फेसबुकवर टॅग करूनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वतकडे ठेवायला विसरू नका. सर्वात महत्वाचं. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सध्या संपूर्ण राज्याचे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. भोंगा हा धार्मिक नाही, तर सामाजिक विषय आहे. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, तो रस्त्यावर आणू नये. एक, दोन दिवस आपण समजू शकतो. मात्र, 365 दिवस जर या गोष्टी सुरू असतील तर ते योग्य नाही. आम्ही आमच्या कानाला का त्रास करून घ्यायचा. म्हणून हा विषय थांबला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले होते.