भारत

काँग्रेसमध्ये घमासान! दिग्गज नेते काँग्रेस सोडण्याच्या विचारात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May : राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घमासान माजले आहे. गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा सारखे दिग्गज नेते उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे पक्षात त्यांची मनधरणी करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मंगळवारी गुलाम नबींशी फोनवरुन संवाद साधत त्यांची मनधरणी केली. दुसरीकडे, शर्मा यांनी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील असा दावा केला जात आहे. असे झाले तर काँग्रेसला मोठे भगदाड पडेल.

दुसरीकडे, महाराष्ट्रातही या प्रकरणी तीव्र असंतोष उफाळून आला आहे. माजी आमदार आशिष देशमूख यांनी मंगळवारी राज्य काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षावर स्थानिक नेत्याऐवजी बाहेरील नेत्याला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. ते इम्रान प्रतापगढी यांना राज्यातून राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे नाराज आहेत. काँग्रेस नेते विश्वबंधू राय यांनीही या प्रकरणी सोनियांना पत्र लिहून 6 लाखांच्या मतफरकाने पराभूत झालेल्या नेत्याला कोणत्या आधारावर राज्यसभेवर पाठवले जात आहे? असा प्रश्न केला आहे.

काँग्रेसकडे केवळ 10 नेत्यांनाच राज्यसभेवर पाठवता येईल एवढे संख्याबळ आहे. पण, या 10 जागांसाठी 20 हून अधिक नेते इच्छुक असल्यामुळे नेतृत्वाची अडचण झाली आहे. इच्छुकांत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल सारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. ​​​​​​​इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आल्यामुळे आशिष देशमूख यांनी महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसचे राजस्थान व छत्तीसगडमध्ये स्वतःचे तर झारखंडमध्ये आघाडी सरकार आहे. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या तिन्ही राज्यांत घमासान माजले आहे. राजस्थानचे काँग्रेस आमदार भरत सिंह यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहून नाराजी कळवली आहे. ते म्हणाले – बडे नेते सध्या लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हे नेते राज्यसभेच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे, सोशल मीडियावर प्रवक्ते पवन खेडा, नगमा यांच्यासह अनेक नेत्यांनी तिकिट वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसने राज्यसभेसाठी रणदिप सुरजेवाला, अजय माकन, पी. चिदंबरम, मुकूल वासनिक आदी 10 नेत्यांना उमेदवारी दिली आहे.