भारत

संकट अन दिलासा! मान्सून आगमनानंतर हवामानात बदल…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May :- केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक राज्यांतील हवामानात बदल झाला आहे. ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत तेलंगणा, कर्नाटक, उत्तराखंड, विदर्भ, मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रासह दक्षिण छत्तीसगड, आंध्र प्रदेश किनारपट्टी व ओडिशाच्या एक किंवा 2 भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

राजधानी दिल्लीत सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे तापमानात 10 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, बिहारमध्ये पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यामुळे खात्याने येथील 7 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजस्थान व मध्य प्रदेशासारख्या राज्यांना अद्याप पावसाची प्रतीक्षा करावी लागेल. पंजाब व हरयाणातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. यामुळे उकाड्यापासून काहीअंशी सुटका झाली आहे. झारखंड, छत्तीसगडच्या काही भागांतही ढगांची गर्दी दिसून येत आहे.

स्कायमेटच्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान व निकोबर बेटसमूह, लक्षद्वीप, केरळचा काही भाग, कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू व रॉयलसीमात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशातील काही भागांतही हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तेलंगणा, कर्नाटक, उत्तराखंड, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, आंध्र प्रदेश किनारपट्टी व ओडिशाच्या एक ते 2 भागांत हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. हरयाणा, दिल्ली व पश्चिम उत्तर प्रदेशातही मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.