महाराष्ट्र

रुपाली चाकणकर यांना धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

31 May :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भाऊसाहेब रामदास शिंदे असे संशयिताचे नाव आहे. त्याने चाकणकर यांना पुढील 24 तासात ठार मारू, अशी धमकी दिली होती. संशयित भाऊसाहेब शिंदे हा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आहे. त्याला नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी चिंचोडी पाटील येथून अटक केली आहे. शिंदेला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

चाकणकर यांना 24 तासांत जीवे मारु, असा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली होती. अहमदनगरमधील व्यक्तीने हा फोन केल्याची माहिती मिळताच नगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आज सकाळी सहायक निरीक्षक राजेंद्र सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले.

रुपाली चाकणकर यांना या अगोदरही दोन वेळा ​​​​​​​धमकीचा फोन आला होता. तुमचा कार्यक्रम करू, अशा अश्लील भाषेत फोन करून धमकी देण्यात आली होती. तर एका व्यक्तीने रुपाली चाकणकर यांचे पुण्यातील सिंहगड रोडवरील धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.