महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

27 May :- राज्यसभेच्या उमेदवारीवरून आज छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली होती. अपक्ष उमेदवारी देण्याबाबत ड्राफ्टही तयार करण्यात आला होता. मात्र, अचानक माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असा आरोप संभाजीराजेंनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार टाळण्यासाठी मी निवडणूक लढणार नाही, अशी घोषणाही पत्रकार परिषदेत संभाजीराजेंनी केली. जनता हीच माझी खरी ताकद आहे. यापुढे माझ्या स्वराज्य संघटनेला मी बळकट करणार आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आणि विस्थापित मावळा संघटित करणार, असे संभाजीराजे म्हणाले. मागील 15 वर्षे मी जनतेसाठी अहोरात्र काम केले. यापुढेही अधिक बळकटीने हे काम पुढे नेणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले, माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुण्यात मी दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आणि स्वत:ची स्वराज्य संघटना स्थापन करणार. या पत्रकार परिषदेतच मी सर्वपक्षीयांना राज्यसभेसाठी मला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसांतच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचे दोन खासदार माझ्याकडे पाठवले.

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमची पहिली बैठक झाली. त्या बैठकीतच खासदारांनी मला शिवसेना पक्ष प्रवेशाची अट सांगितली होती. मात्र, आपण त्यास तेव्हाच स्पष्ट नकार दिला होता, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, ओबेरॉय हॉटेलातील चर्चेत राज्यसभेच्या अपक्ष उमेदवारीबाबत मी स्पष्टपणे भूमिका मांडल्यानंतर दोनच दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला व चर्चेसाठी वर्षावर निमंत्रित केले. लोकशाहीत मुख्यमंत्रीपद हे राज्याच्या केंद्रस्थानी असते म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी छत्रपती आम्हाला शिवसेनेत हवेत, असे प्रपोजल दिले. त्याचक्षणी मी तो प्रस्ताव नाकारला.

अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेना आपल्याला पाठिंबा देऊ शकत नसेल तर शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून मला उभे करा, अशी मागणी मी त्यांच्याकडे केली. मात्र, शिवसेनेचे 2 उमेदवार राज्यसभेवर पाठवायचे आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मला नकार दिला. तरीदेखील या प्रस्तावावर विचार करून दोन दिवसानंतर पुन्हा भेटू, असे दोघांमध्येही ठरले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मला पुन्हा शिवसेनेच्या मंत्र्यांनी फोन केला. त्यानंतर शिवसेनेचा एक मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या एका स्नेहीसोबत पुन्हा ओबेरॉय हॉटेलात चर्चा झाली. त्यात मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेप्रमाणे शिवसेनेकडून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मला देण्याबाबत ड्राफ्ट करण्यात आला आणि हाच ड्राफ्ट फायनल असल्याचे तेव्हा मंत्र्यांनी मला सांगितले होते, असा दावा संभाजीराजेंनी केला. मात्र, या बैठकीनंतर मी कोल्हापूरला रवाना होताच कोल्हापुरातील माझाच कार्यकर्ता संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांवर झळकले. मी ताबडतोब शिवसेनेच्या मंत्र्यांना फोन करून याचा जाब विचारला. मात्र, ते मंत्री काहीच बोलले नाहीत. मी मुख्यमंत्र्यांनाही फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही, असे संभाजीराजेंनी सांगितले.

संभाजीराजे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही स्मारकाला भेट द्यावी. शिवाजी महाराजांना वंदन कारवे व मी खोटे बोलत असेल तर तसे सांगावे, असे आव्हान यावेळी संभाजीराजेंनी दिले. मुख्यमंत्र्यांनी शब्द का पाळला नाही, हे आपल्याला कळले नाही. मात्र, यामुळे आपल्याला फार दु:ख झाले, असे संभाजीराजे म्हणाले.

सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी आपली भूमिका होती. मात्र, काही आमदारांनी आपल्यावर पक्षाचा दबाब आहे, असे सांगितल्याचे संभाजीराजे म्हणाले. मात्र, आता निवडणूक लढणार नसल्यामुळे पूर्ण वेळ आपल्या स्वराज्य संघटनेला देणार असल्याचे ते म्हणाले.

संभाजीराजे म्हणाले की, आपल्याला कोणत्याही राजकीय पक्षाचे वावडे नाही. मात्र, प्रत्येक पक्षाची एक भूमिका असते. त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्या भूमिकेचा तुम्हाला सन्मान ठेवावा लागतो. त्यामुळे नकळत आपल्यावर बंधन येते. असे कोणतेच बंधन मला नको असल्यामुळेच मी अपक्ष उमेदवारीबाबत आग्रही होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.