महाराष्ट्र

उद्योगपती अविनाश भोसलेंना अटक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 May :- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बडे प्रस्थ अविनाश भोसले यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी बेड्या ठोकल्या. डीएचएफएळ घोटाळ्याप्रकरणी विभागाने ही कारवाई केली. भोसले गत अनेक दिवसांपासून येस बँक व डीएचएफएल बँक घोटाळ्याप्रकरी सीबीआयच्या रडारवर होते. त्यांचे राज्यातील अनेक बड्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईमुळे राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे.

सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसलेंवर ही कारवाई केली. भोसले यांचे नाव येस बँक घोटाळाप्रकरणीही चर्चेत होते. या दोन्ही प्रकरणाची सीबीआयने चौकशी सुरू केली होती. शिवाय याप्रकरणी पुणे – मुंबई परिसरातील तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यातून सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याचे समजते. त्यातूनच ही कारवाई करण्यात आली आहे.

अविनाश भोसले हे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांचा जन्म संगमनेर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील निवृत्ती गणपत भोसले हे संगमनेर येथील सावर्जनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या अविनाश भोसले यांनी रिक्षाचालक म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रात उडी घेतली. रिक्षा चालक ते मोठे बांधकाम व्यावसायिक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्याबद्दलच्या सक्सेस स्टोरीज नेहमीच सोशल मीडियात व्हायरल होत असतात.

अविनाश भोसले यांची अनेक राजकीय नेत्यांसोबत उठबस आहे. ते कॉंग्रेसचे, माजी वनमंत्री दिवंगत पंतगराव कदम यांचे व्याही आहेत. भोसले यांची मुलगी स्वप्नाली हिचा विवाह कदम यांचा मुलगा विश्वजित कदम यांच्याशी 7 डिसेंबर 2007 रोजी झाला. त्यावेळी विश्वजित कदम हे महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. या लग्नाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती.

अविनाश भोसले यांच्यावर यापूर्वी ईडीने धाड टाकली होती. त्यावेळी त्यांची सुमारे 40.34 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतरची त्यांच्याविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे 2006 साली हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे एका चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी या दोघांच्या राहण्याची सोय पुण्यातील ‘प्रसादतुल्य’ बंगल्यात करण्यात आली होती. हा बंगलाही अविनाश भोसले यांच्या मालकीचा आहे.