महाराष्ट्र

शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी

26 May :- शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आता ईडीच्या रडारवर आले आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरु आहे केली.

अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई आणि पुणे येथील एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याचे समजते. ईडीची एक टीम गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता अनिल परब यांच्या अजिंक्यतारा या निवासस्थानी पोहोचली. पोलिस बदल्यांच्या प्रकरणात सचिन वाझेंच्या जबाबात अनिल परब यांचे नाव समोर आले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, देशमुख, मलिक यांच्यानंतर आता परबांचा नंबर असे सांगत अनिल परब यांनी आता कपड्याची बॅग तयारी ठेवावी, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

अनिल परब यांना चौकशीलाही बोलावले जाणार असल्याचे समजते. अनिल देशमुख प्रकरणात अनिल परब यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणी त्यांची आता चौकशी होणार आहे. अनिल परब यांच्या विरोधात ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. आता त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापेमारी सुरु केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांच्यावर कारवाई सुरु करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.