नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 May :- अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत यांना मोबाईल कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर नवनीत यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. नवनीत यांना मंगळवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने “महाराष्ट्रात तुम्हाला येऊ देणार नाही. तसेच हनुमान चालिसा पठण केल्यास जीवे मारु”, अशी धमकी देण्यात आली.
दरम्यान या धमकीनंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच धमकी देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवनीत यांनी केली आहे. खासदार नवनीत राणा यांना यापुर्वीही धमकी देण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी एका अज्ञाताने नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
गेल्या वेळी शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर धमकीचे पत्र असल्यामुळे राजकीय वर्तुळातही या चर्चांना उधाण आले होते. मात्र या धमकीच्या पत्रात कोणत्याही नेत्याचे नाव मात्र नव्हते. मात्र, नवनीत राणांनी या लेटरहेडवरुन शिवसेनेनंच धमकी दिल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांकडे तक्रार दिली होती. शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या इशाऱ्यावर ही धमकी पाठवल्याचा दावा त्यांनी राणांनी केला होता.
दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणा दांपत्य पहिल्यांदाच विदर्भाचा दौरा करणार आहेत. 28 मे रोजी ते नागपूरला जाणार आहेत. नागपुरात गेल्यानंतर ते पून्हा राम मंदिरात हनुमान चालिसा पठण आणि हनुमान आरती व महापूजा करणार आहेत. त्यानंतर ते अमरावतीला जातील.
28 मे रोजी नागपुरात नवनीत राणा यांच्या हनुमान आरतीच्या वेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाई विरोधात आंदोलन करणार आहे. नवनीत राणा ज्या मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याचं रामनगर हनुमान मंदिरात राष्ट्रवादी कॉंग्रेस महागाईविरोधात आंदोलन करणार आहे. राज्यावरील महागाईचं संकट जावं म्हणून राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे मंदिरात एकाच वेळी राष्ट्रवादी आणि नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे, यामुळे हा सामना चांगलाच रंगणार असल्याची चर्चा सध्या नागपूरात सुरु आहे.