महाराष्ट्र

पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 May :- राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कमी झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या वेशीवर अडकलेल्या मान्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील 4 दिवस कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

काही दिवस वेग मंदावलेल्या मान्सूनची आगेकुच पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मालदीव आणि कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे देशभरात मान्सूपुर्व सरी कोसळत आहेत. यामुळे पुढील 4 दिवस राज्यातदेखील विविध भागात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, पुढील 2 दिवस उत्तर, पूर्व भारतातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा मार्च महिन्यापासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झाल्यानंतर मे महिन्यातही राज्यात उष्ण लाट कायम होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून उष्ण लाट ओसरली असून अद्यापही अनेक भागांत उन्हाचा चटका कायम आहे. काल राज्यात केवळ ब्रह्मपुरी येथे 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 42 अंशांच्या खाली घसरला आहे. कोकणात कमाल तापमान 32 ते 36 अंश, मध्य महाराष्ट्रात 27 ते 38 अंश, मराठवाड्यात 37 अंश आणि विदर्भात 39 अंशांच्या दरम्यान तापमान आहे.

पुणे 34.7, कोल्हापूर 33.1, महाबळेश्वर 27.1, नाशिक 34.7, सांगली 34, सातारा 33, सोलापूर 38, रत्नागिरी 32.8, औरंगाबाद 37.3, परभणी 38.6, अकोला 41, अमरावती 40, बुलडाणा 39, ब्रह्मपुरी 42, नागपूर 41, वर्धा 41, यवतमाळ 40.