महाराष्ट्र

मंकीपॉक्स आजाराविषयी राजेश टोपेंचं मोठं विधान

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 May :- गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर मंकीपॉक्स या आजाराची मोठी चर्चा सुरू झाली आहे. कांजिण्या किंवा देवी अर्थात स्मॉलपॉक्स किंवा चिकनपॉक्सप्रमाणेच मंकीपॉक्समुळे देखील अंगावर पुरळ उठत असल्याचं लक्षणांमधून दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेत या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि अमेरिकेत देखील काही प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर त्यासंदर्भात भारतात देखील काहीसं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकतंच करोनाच्या धक्क्यातून हळूहळू सावरू पाहणाऱ्या जगाला मंकीपॉक्समुळे काहीशी चिंता सतावू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर त्याचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना भारतातील परिस्थिती आणि महाराष्ट्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती दिली आहे. “मंकीपॉक्स हा दक्षिण आफ्रिकेतून येणारा आजार आहे. ब्रिटन, अमेरिका या देशांमध्ये मंकीपॉक्सच्या काही केसेस आढळल्या आहेत. पण आपल्या देशात एकही मंकीपॉक्सची केस आढळली नाही”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मंकीपॉक्सचा विषाणू कसा पसरतो, याविषयी देखील राजेश टोपेंनी सविस्तर माहिती दिली आहे. “हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने पसरतो. पुरळ येणे, ताप येणे ही या आजाराची लक्षणं आहेत. साधारण २ ते ४ आठवडे हा आजार राहू शकतो. याचा मृत्यूदर १ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. एक ते दोन दिवस पुरळ आणि ताप येण्याच्या दरम्यान हा आजार दुसऱ्यांना होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली आहे.