काँग्रेसमध्ये एका जागेसाठी गोंधळ; दिल्लीत 2 दिवस बैठक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 May :- राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक पार पडणार आहे. या सहा जागांपैकी काँग्रेसच्या पदरी एक जागा आहे. काँग्रसेचा एक उमेदवार राज्यसभेवर जाणार आहे. मात्र, काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या या एका जागेसाठी प्रचंड गोंधळ सुरू आहे. आजपासून राज्यसभेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असली तरीही, काँग्रेसकडून कोण राज्यसभेत जाणार हे अजूनही स्पष्ट नाही. कारण, काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत.
राज्यसभेसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याच्या काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा केलेली नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांची दोन दिवस दिल्लीत बैठक होणार असून, राज्यसभेसाठी मुंबईतून मिलिंद देवरा, संजय निरुपम तर दिल्ली वर्तुळात गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या नेत्यांची नावे चर्चेत आहे.
येत्या 10 जूनला महाराष्ट्रासह देशातील 15 राज्यातील 57 रिक्त राज्यसभेच्या जागांवर निवडणूक होणार आहे. त्यात महाराष्ट्रासाठी सहा जागांवर मतदान होणार आहे. राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य 4 जुलै रोजी निवृत्त होत आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहे. त्यात काँग्रेसचे 44, राष्ट्रवादीचे 54 तर शिवसेनेचे 55 आमदार आहेत. इतर पक्ष तसेच अपक्ष प्रत्येकी 8-8 असे महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर विरोधी पक्ष भाजपकडे 113 आमदार आहे. भाजपचे 106, रासप 1, जनस्वराज्य 1 आणि अपक्ष 5 असे 113 आमदार भाजपकडे आहेत.
राज्यसभेचा एक सदस्य निवडून आणण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. संख्याबळाप्रमाणे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा एक उमेदवार राज्य सभेवर निवडणूक जाऊ शकतो. भाजपकडे 113 आमदार आहेत, भाजपचे दोन उमेदवार सहज राज्यसभेवर जाऊ शकतात. सहाव्या जागेवर शिवसेना निवडणूक लढवणार असून, त्यासाठी छत्रपती संभाजी राजेंच्या नावाची चर्चा आहे.