जनतेची शुद्ध फसवणूक; इंधन दरकपात केलीच नाही- फडणवीसांचा दावा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
23 May :- लज्जास्पद महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे असा खुलासा करीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या इंधन धोरणावर टीका केली.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात 2 रुपये 08 पैसे, तर डिझेलवरील करात 1 रुपया 44 पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यांनी याबाबत एक ट्विटही केले आहे.
नाशिकमध्ये पत्रकारांनी राज्याने इंधन दरकपातीसंदर्भात प्रश्न विचारला असताना फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ”असं वाटतं की राज्य सरकारने सामान्य माणसाची थट्टा केली. दीड रुपये आणि दोन रुपयांनी इंधनाचे दर कमी करणं ही थट्टा आहे. कारण सर्व राज्यांनी आतापर्यंत 7 रुपयांपासून 15 रुपयांपर्यंत दर कमी केलाय. महाराष्ट्र हे देशातील सर्वात समृद्ध राज्य आहे. देशाच्या जीडीपीच्या 15 टक्के जीडीपी एकट्या महाराष्ट्राचा आहे.
“केंद्रातल्या सरकारने 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान स्वीकारले आणि आपण मात्र 2500 कोटींचे नुकसान होत असल्याचे सांगत आहेत. खरं तर किमान केंद्र सरकारने या ठिकाणी जेवढी दरकपात केली त्याच्या दहा टक्के तरी कपात राज्य सरकारने करायला पाहिजे होती पण प्रत्यक्षात राज्य सरकारने कोणतीच कपात केली नाही जेही दोन रुपये इंधनावर कमी झाले तो केंद्रातील दरकपातीचा परिणाम आहे. राज्य सरकारने मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर पण राज्य सरकारने सामान्य नागरिकांची क्रूर थट्टा केली आहे. असेही फडणवीस म्हणाले.