महाराष्ट्र

‘या’ सभेत राज ठाकरे सांगणार अयोध्या दौऱ्याचे ‘राज’

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 May :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. स्वत: राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेत आपण दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनूसार, राज ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राज ठाकरे यांना प्रकृतीच्या कारणास्तवच आपला पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतावे लागले. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्याबाबतीत शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच राज ठाकरे दौऱ्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येते.

पुण्यातील स्वारगेट भागातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 22 मेरोजी राज ठाकरेंची सभा होत आहे. या सभेत ते अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. युपीचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला आहे. राज ठाकरे माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

राज ठाकरे यांचा दौरा स्थगित करण्यामागे हे तर कारण नाही ना, अशीही आता चर्चा होत आहे. मात्र, मनसे नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ब्रिजभूषण म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश नव्हे, अशी भूमिका यापूर्वीच मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर यांनी मांडली आहे. ब्रिजभूषण यांच्या विरोधामुळे 5 जूनचा दौरा रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही, असे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे. तर, आज मनसे नेते अमेय खोपकर यांनीही राज ठाकरे यांचा फोटो ट्विट करत वादळाला कोण रोखू शकणार, असे म्हटले आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसेच्या अयोध्या दौऱ्याला उघड विरोध करून त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. खासदार ब्रिजभूषण यांच्यामुळे राज ठाकरे यांची मराठी भाषिकांमध्ये असलेल्या आक्रमक नेता या प्रतिमेला काहीसा तडा बसत आहे. त्यामुळेच 22 मे रोजी पुण्यातील सभेत एमआयएमचे अकबरुद्दीन ओबेसी आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह या दोघांनाही राज ठाकरे सडेतोड उत्तर देऊ शकतात. तसेच, आपल्या अयोध्या दौऱ्याबाबतदेखील ते भूमिका स्पष्ट करतील.