मराठवाडा

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा फटका

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 May :- सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर भागात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होती. या वादळी पावसामध्ये पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील आत्माराम मोरे या शेतकऱ्याची उतरण्यास आलेली साधारणत: २ एकरवरील केळीची बाग वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाली. याच परिसरात वादळी वाऱ्यामुळे डाळिंबाच्या झाडांची फुले, फळे गळून पडली. द्राक्षांच्या बागा घडांसह वाकून गेल्या. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. लवकरच याचा पंचनामा होणार आहे.

राज्यात ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असून गुरुवारी (१९ मे) मालेगाव येथे सर्वाधिक ४३.० अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील ब्रह्मपुरी आणि वर्धा येथे पाऊस झाला असून नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलडाणा येथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे राहिल्याने मराठवाड्यातील नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी नांदेड आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह जिल्ह्यातील हदगाव, किनवट तालुक्यातील शिवणी, इस्लामपूर, माहूर, अर्धापूरमध्ये गुरुवारी पहाटे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मराठवाड्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पारा ४२ ते ४३ अंशांवर राहत आहे. गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. गुरुवारी सकाळी झालेल्या पावसात जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तसेच काही ठिकाणी मोठमोठी झाड उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.