News

गेवराई पं.स.मधील रोहयो घोटाळा चौकशीची मागणी


आ.लक्ष्मण पवारांच्या ताब्यातील पंचायत समिती भ्रष्टाचाराच्या संशयात

गेवराई, दि.०५ (प्रतिनिधी) ः- भाजपा आ.लक्ष्मण पवार यांच्या ताब्यातील गेवराई पंचायत समितीमधील रोहयो घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सात पंचायत समिती सदस्यांनी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासह इतरांना त्यांनी लेखी निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतीकडून मागणी नसलेल्या आणि कृती आराखड्यात समाविष्ट नसलेल्या कामांना लाचखोरी करून मान्यता दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंचायत समिती कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडले असून पैसे दिल्याशिवाय करोना संकटाच्या काळात सुध्दा सर्वसामान्यांची कामे होत नसून पंचायत समितीमध्ये रोहयो भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी या सात पंचायत समिती सदस्यांनी केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने गेवराई पंचायत समिती विरुध्द कोणती कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
गेवराई पंचायत समितीमध्ये मग्रारोहयो अंतर्गत गॅबियन बंधारे चर खोदाई भुमिगत बंधारे, एल.बी.सी. यांसह शेकडो नविन सामुहिक कामांना लाचखोरी करून मोठ्या प्रमाणावर मान्यता दिली आहे. ग्रामपंचायतीने सुचविलेली कामे आणि पंचायत समितीने मंजुर केलेल्या कामामध्ये मोठी तफावत आहे. सन २०२०-२१ च्या लेबर बजेट व कृती आराखड्यात समाविष्ट नसलेल्या कामांना सुध्दा पैसे घेवून ऑफलाईन पध्दतीने दलालांच्या शिफारशीनंतर मान्यता दिली आहे. यांसह अनेक गंभीर स्वरुपाचे आक्षेप गेवराई पंचायत समितीच्या सदस्यांनी केले आहे. या निवेदनावर परमेश्‍वर खरात, जयसिंह जाधव, कु.मोनिका खरात, शेख दौलताबी रशिद, सौ.सुमित्रा देवकर, भिष्माचार्य दाभाडे आणि सौ.मंजुषा महादेव औटी या सात पंचायत समिती सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाचखोरी, दलाली वाढली असून पैसे दिल्याशिवाय कोरोनाच्या काळात सामान्यांची कामे होत नाहीत. पंचायत समितीला एक समांतर प्रशासन यंत्रणा दलालांनी उभी करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पंचायत समितीमध्ये होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सुध्दा हे निवेदन देण्यात आले आहे. बीड पंचायत समितीच्या रोहयो घोटाळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केलेल्या फौजदारी कारवाई नंतर गेवराई पंचायत समितीच्या या तक्रारीवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. आ.लक्ष्मण पवार यांची स्वच्छ प्रतिमा पंचायत समितीतून रोहयो घोटाळ्यामुळे डागाळल्याची चर्चा सुध्दा तालुक्यात सुरु आहे.