राणा-राऊत काश्मिरच्या थंड वातावरणात एकत्र
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
19 May :- महाराष्ट्रात हनुमान चालिसा आंदोलनावरुन रान माजवणारे राणा दाम्पत्य आणि त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवून वातावरण आणखीनच गरम करणारे शिवसेना नेते संजय राऊत हे महाराष्ट्रातून काश्मिरच्या थंड वातावरणात अभ्यास सहलीवर गेले आहेत. विशेषतः एकमेकांविरुद्ध विळ्या-भोपळ्याचे सख्ख्य दाखवणारे हेच राणा आणि राऊत यांनी काश्मिरात एकमेकांशी हितगुज साधले आणि गप्पांच्या मैफलीत एकत्र भोजनावर ताव मारतानाचे फोटोही आता व्हायरल झाले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचा मुद्दा महाराष्ट्रात तापवला, त्या मुद्द्याचा आधार घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. त्यानंतर महाराष्ट्रभर हनुमान चालिसाच्या नावाखाली या राजकारण्यांनी पाॅलिटीकल ड्रामा केला, पण म्हणतात ना राजकारण्यांचे हाडाचे वैर कुणाशी नसतेच तसाच प्रकार शिवसेना नेते संजय राऊत आणि राणा यांच्यात दिसून आला.
संजय राऊत व रवी राणा एकत्र आल्याचे व एकमेकांशी संवाद साधत असल्याचे फोटो समोर आले आहेत. समाज माध्यमांवरही हे फोटो व्हायरल झाले आहेत.या फोटोत राऊत आणि राणा सोबत ‘स्नेहभोजन’ घेत असल्याचेही दिसून येते तसेच ते एकमेकांशी चर्चा करीत असल्याचेही त्यातून अंदाज येतो.
संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा हे दोघेही संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य आहेत. या समितीचा अभ्यास दौरा सध्या लेह-लडाखमध्ये सुरू आहे. हा दौरा चार दिवसांचा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राऊत लडाखमध्ये आहेत. आमदार रवी राणा हेही लडाखमध्येच आहेत. त्याच वेळी राणा दाम्पत्य व संजय राऊत एकत्र आले आहेत. राणा दाम्पत्य व राऊत यांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय तणाव काही प्रमाणात कमी होणार हे मात्र निश्चित आहे.
संसदेची 40 जणांची समिती असते खासदार म्हणून सहभागी व्हावे लागते काही विषय अशाच गोष्टीमुळे टाळतो. पण लडाखचा विषय असल्याने टाळता येत नाही. सोबत जेवण केले, त्यात एवढं काय असा सवाल करुन अनेक खासदार भोजनाला होते, शासकीय काम असते सोबत राहावे लागते कुटुंब घेऊन स्नेहभोजनाला थोडीच गेलो आहे असेही संजय राऊत यांनी स्नेहभोजन प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध संजय राऊत यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेनेच्या वाट्याला जाणार असाल तर 20 फुट खड्ड्यात गाडण्याची भाषा संजय राऊत यांनी केली होती. विशेषतः त्यांनी दाऊदशी संबंधित युसुफ लकडावाला यांच्याकडून राणा कुटुंबाने 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा सनसनाटी आरोपही केला होता. त्यानंतर मात्र त्यांच्यात दिलजमाई कशी झाली हे मात्र अनुत्तरीत असून यामुळे यानिमित्ताने राजकारण्यांचे चेहरे जनतेसमोर आले आहेत.