संभाजीराजेंना मोठा धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
17 May :- राज्यसभेसाठी मला मदत करा, असे आवाहन करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यसभेसाठी सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. शिवसेनेच्या या घोषणेमुळे राजेंची राज्यसभेची वाट बिकट झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आपल्याला राज्यसभेसाठी संधी द्यावी, असे साकडे छत्रपतींनी एका पत्रातून आमदारांना घातले आहे.
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी सर्वपक्षीयांनी मला मदत करावी, असे आवाहन मागील आठवड्यात संभाजीराजेंनी केले होते. त्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी साद दिली होती; पण आज मंत्री परब यांनी राज्यसभेसाठी शिवसेना सहावा उमेदवार देणार असल्याची घोषणा केली, शिवसेनेची ही घोषणाच संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या मार्गात अडथळे आणणारी आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 15 राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या 57 खासदारांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आणि महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपचे दोन उमेदवार तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तत्पूर्वी, उर्वरित सहाव्या जागेसाठी शिवसेनेने दावा सांगितला आहे.
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची राज्यसभेवर उमेदवारी निश्चित आहे. मात्र, आता सहाव्या जागेसह शिवसेना राज्यसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे एक उमेदवार जवळपास निश्चित झाल्यानंतर आता शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता वाढली आहे.
राजेंना पाठिंबा देण्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे दिसून येत आहे. आता अनिल परब यांनी घोषणा करून संभाजीराजे छत्रपतींना खिंडीत गाठले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने सहावा उमेदवार राज्यसभेसाठी उभा करण्याचा निर्णय परस्पर घेतल्यामुळे काॅंग्रेसच्या गोटात नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. राजेंची भाजपची सलगी असल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांत त्यांना पाठिंबा देण्याबाबत मतभिन्नता आहे.