News

करोनाने केली दोन जीवांची ताटातूट; ‘ते’ बाळ जन्मताच झालं पोरकं

औरंगाबाद:औरंगाबाद शहर परिसरातील ३० वर्षीय करोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ( घाटी ) गुरुवारी (४ जून) मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९३ करोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे. तसेच आज आणखी ५९ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १८२८ झाली आहे, तर आतापर्यंत ११२६ करोना बाधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत व सध्या ६०९ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये भारतमाता नगर येथील १, इंदिरानगर, न्यू बायजीपुरा १, न्यू कॉलनी, रोशन गेट १, भावसिंगपुरा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, बेगमपुरा (१), चिश्तिया कॉलनी १, फाझलपुरा १, रेहमानिया कॉलनी १, गांधी नगर १, युनूस कॉलनी २, जुना मोंढा, भवानी नगर १, शुभश्री कॉलनी, एन-सहा १, संत ज्ञानेश्वर नगर, एन-नऊ १, आयोध्या नगर, एन-सात ७, बुढीलेन ३, मयूर नगर, एन-अकरा १, विजय नगर, गारखेडा ३, सईदा कॉलनी १, गणेश कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजलपुरा १, रोशनगेट परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, औरंगपुरा २, एन-आठ, सिडको १, समता नगर ४, ‍मिल कॉर्नर २, जवाहर कॉलनी ३, मोगलपुरा २, जुना मोंढा १, नॅशनल कॉलनी १, राम मंदिर, बारी कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी १, देवडी बाजार १, एन-सात सिडको १, एन-बारा १, आझाद चौक १, टी.व्ही. सेंटर, एन-अकरा १, कैलास नगर १ व आणखी एका ठिकाणच्या रहिवाशाचा समावेश आहे. यामध्ये १९ महिला आणि ४० पुरुषांचा समावेश आहे.

घाटीत उपचारादरम्यान मृत्यू

शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथील ३० वर्षीय करोनाबाधित महिलेचा गुरुवारी (चार जून) दुपारी दोन वाजता घाटीमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ७२, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण २०, तर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका बाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील करोना बाधिताच्या मृत्युची संख्या ९३ झाली आहे.

बाळ सुखरूप पण…

शहरातील कटकट गेट परिसरातील या गरोदर महिलेला २८ मे रोजी दुपारी दोन वाजता घाटीमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याचदिवशी एक्लामशिया आजारामुळे तिची सिझेरियनद्वारे प्रसूती करण्यात आली. तिने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. संबंधित महिलाही बाधित भागातून आल्यामुळे तिचा स्वॅब घेण्यात आला होता व दुसऱ्या दिवशी महिला ही करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. संबंधित महिला ही बाधित आढळून आल्याने तिला कोविड वॉर्डामध्ये हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाले होते व पाच वेळा डायलिसिस करण्यात आले होते. त्यानंतर तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा गुरुवारी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. दरम्यान, नवजात बालिकेवर घाटीतील नवजात शिशू कक्षामध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.