मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, 8 जिल्ह्यांना येलो अलर्ट
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 May :- अंदमान आणि निकोबार बेटांवर 24 तासांत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. आज अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाल्यास केरळमध्ये तो 27 मेपर्यंत पोहोचेल. त्यामुळे पावसासाठी महाराष्ट्र, केरळ, तामिनाडू, अंदमान-निकोबारमध्ये पोषक हवामान तयार होत आहे. या राज्यांमध्ये अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. महाराष्ट्रात आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर तर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांत उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील डोंगरी राज्ये जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत गारांच्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पुढील दोन दिवस धुळीचे वादळ उठण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.