सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर…
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 May :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत मिळून भल्या पहाटे राज्यपालांकडे जावून सरकार स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ते सरकार त्याच दिवशी कोसळलं होतं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं सरकार यशस्वी न होऊ शकल्याचं शल्य भाजपच्या मनात अद्यापही आहे. त्यामुळेच शिवसेनेकडून वारंवार या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला जातो. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अरे सकाळचा शपथविधी केला. पण तो यशस्वी झाला नाही याचा मला आनंद आहे. पण यशस्वी जरी झाला असता ना तरी माझ्या मंत्रिमंडळात कुठला वाझे झाला नसता. माझ्या मंत्रिमंडळात अनिल देशमुख आणि त्या नवाब मलिकाची हिंमत झाली नसती. अरे ज्याक्षणी दाऊदचा साथी मंत्रिमंडळात ठेवायचा की सरकारला लाथ मारायची, ठोकर घालायची? असा विषय आमच्यासमोर आला असता त्यावेळी दाऊदच्या साथीदाराला मंत्रिमंडळात ठेवण्याऐवजी आम्ही त्या मंत्रिमंडळाला ठोकर मारली असती. पण आज त्याचंही समर्थन करत आहेत. वर्क फ्रॉम जेल करत आहेत. त्यांचे फोटो छापले जात आहेत. आणि आम्हाला विचारतात, तुम्ही त्यांच्यासोबत बसले असते का?”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.