राजकारणमहाराष्ट्र

पटोलेंनी राष्ट्रवादीला धोका दिला”

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मध्ये रोजचाच कलगीतुरा चाललेला पाहायला मिळतोय दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहे.भंडारा-गोंदियामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला सोबत न घेता राष्ट्रवादीने भाजपासोबत युती केली. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्यावर दगाबाजीचा गंभीर आरोप केला. आता याला राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी निवेदन जारी करत थेट प्रत्युत्तर दिलंय. या निवेदनात त्यांनी भंडारा-गोंदियात काँग्रेसने भाजपासोबत केलेल्या युतीचा इतिहास जाहीर केलाय. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये.

“भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीतील वस्तुस्थिती २०१० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १४ सदस्य निवडून आले, पण तेव्हाही काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवून भारतीय जनता पक्षासोबत सत्ता ग्रहण केली. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षाचा असतो यावेळी प्रथम काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपासोबत समझोता करून सत्ता ग्रहण केली. दुसऱ्या अडीच वर्षाच्या टर्मला तत्कालीन काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी भाजपाशी युती करून आपला विश्वासू चंद्रशेखर ठवरे यांना अध्यक्ष बनविले.”

“२०१५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त २० सदस्य निवडून आले. काँग्रेस पक्षाचे १६ सदस्य निवडून आले होते, तरी काँग्रेस पक्षाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपासोबत समझोता करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवले,” असा आरोप शिवाजीराव गर्जे यांनी केला.

“गोंदिया जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून काँग्रेस पक्षाने आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेच्या बाहेरच ठेवले आहे. यात प्रामुख्याने तत्कालीन आमदार गोपालदास अग्रवाल व आमदार नाना पटोले यांचाच हात राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा या निवडणूका झाल्या तेव्हा सर्व तक्रारी काँग्रेस नेतृत्वाकडे करण्यात आल्या होत्या. परंतू काँग्रेस पक्षाने कारवाई न करता उलट आमदार गोपालदास अग्रवाल यांना महाराष्ट्र विधान मंडळ लोक लेखा समितीचे अध्यक्ष पद देऊन पुरस्कृत केले. आमदार नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप-काँग्रेस पक्षाची युती कायम होती.”

“भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २०१५ मध्ये आघाडी करून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनविले. त्याच काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बांधकाम विभाग सभापती पद देण्याचे काँग्रेस पक्षाने मान्य केले होते, पण आमदार नाना पटोले व काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पूर्ण न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धोका दिला. विधान परिषद निवडणुकीत ५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस पक्षाने भाजपाचे उमेदवार परिणय फुके यांना मतदान करून त्यांना विजयी केले होते,” असंही शिवाजीराव गर्जे यांनी नमूद केलं.

गर्जे म्हणाले, “६ मे २०२२ रोजी काही पंचायत समिती सभापती निवडणुका संपन्न झाल्या. त्यात काँग्रेस पक्षाने तुमसर पंचायत समितीमध्ये भाजपासोबत युती करून भाजपाचे सभापती व काँग्रेसचे उपसभापती निवडून आणले. परंतू या पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकत होते.”

“१० मे २०२२ रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. यामध्येही काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपासोबत युती करून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष व भाजपचे संदीप टाले यांना उपाध्यक्ष केले. नुकत्याच झालेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते,” असंही त्यांनी सांगितलं.