भारत

योगी सरकारचा मोठा आदेश; राष्ट्रगीत अनिवार्य…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 May :- उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील सर्वच मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण बोर्डाने यासंबंधीचे आदेश जारी केलेत. हा आदेश सर्वच मान्यताप्राप्त, अनुदानित व विनाअनुदानित मदरशांवर लागू असेल. या आदेशानुसार, वर्ग सुरू होण्यापूर्वी प्रार्थनेवेळी राष्ट्रगीत होईल. रमजान व ईदच्या सुट्टीनंतर गुरुवार म्हणजे आजपासून सर्वच मदरसे सुरू झालेत. तर 14 तारखेपासून मदरशांत बोर्ड परीक्षा होणार आहेत. त्यामुळे हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे.

मदरशांत राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या 24 मार्चच्या बैठकीत घेण्यात आला होता. हा आदेश आता तत्काळ प्रभावाने लागू झाल्याचे रजिस्ट्रार निरीक्षक एस.एन. पांडे यांनी सांगितले. यूपी मदरसा बोर्डाच्या परीक्षा 14 ते 23 मेपर्यंत होतील. लखनऊ जिल्हा अल्पसंख्यक कल्याण अधिकारी जगमोहन यांच्यातर्फे सर्वच मदरशांना परीक्षेचे वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. त्यात परीक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

जिल्हा अल्पसंख्यक अधिकाऱ्यांनी सांगितले की, अरबी, पर्शियनच्या 2022 च्या परीक्षा 14 मेपासून सुरू होतील. परीक्षा पहिल्या सत्रात सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत व दुसऱ्या सत्रात दुपारी 2 ते 5 दरम्यान आयोजित केली जाईल.

यंदा वार्षिक परीक्षेसाठी एकूण 1 लाख 62 हजार 631 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात माध्यमिक वर्गाच्या परीक्षेसाठी सर्वाधिक 91 हजार 467 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर उच्च माध्यमिकसाठी 25 हजार 921 तर कामिल फर्स्ट इअरसाठी 13 हजार 161 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कामिल द्वितीय वर्षासाठी 10 हजार 888, कामिल तृतीय वर्षासाठी 9 हजार 796, फाजिल प्रथम वर्षासाठी 5 हजार 197 व फाजिल द्वितीय वर्षासाठी 6,201 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे योगी सरकारने नुकतेच अनधिकृत भोंगे उतरवण्याचे किंवा ते नियमांतर्गत हळू आवाजात वाजवण्याचे आदेश जारी केले होते. या अंतर्गत अनेक मशिदींवरील भोंगे काढण्यात आले होते. या निर्णयाचे राज्यात प्रतिकूल पडसाद उमटले होते.