राज्यांना लॉटरी ; ‘करोना’च्या संकटात केंद्राने दिला सुखद धक्का
नवी दिल्ली : करोनाचे संकट आणि कर महसूल आटल्याने हवालदील बनलेल्या राज्य सरकारांना केंद्र सरकारने आज सुखद धक्का दिला. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर भरपाईचे (GST Compensation) ३६४०० कोटी आज केंद्राने सरकारने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले. यामुळे राज्यांना करोनाशी लढण्यासाठी आर्थिक बळ मिळणार आहे.अर्थखात्याने याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना आज वस्तू आणि सेवा कर भरपाईपोटी ३६४०० कोटी देण्यात आले आहेत. याआधी केंद्र सरकारने गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीपर्यंत राज्य सरकारांना GST Compensation चे ११५०९६ कोटी वितरित केले होते. गेल्या महिन्यात देखील केंद्र सरकारने १५३४० कोटी जीएसटी भापाई म्हणून वितरित केले होते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्याच्या आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीएसटी भरपाई रक्कम लवकर मिळवी, अशी मागणी केली होती. राज्याचे ‘जीएसटी’पोटी ५०४० कोटी केंद्र सरकारकडून येणे बाकी होते. मात्र आजच्या निर्णयात राज्यालासुद्धा जीएसटी भरपाई मिळाली आहे. एकीकडे केंद्र सरकारला आर्थिक आघाड्यांवर संघर्ष करावा लागत असल्याने GST Compensationचा निधी देण्यास विलंब झाला होता. कर महसुलात घट झाल्याने जीएसटी परतावा देण्याबाबत दिरंगाई झाली होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात काहीसा तणाव निर्माण झाला होता.
लॉकडाउनमुळे एप्रिल पूर्ण महिना बहुतांश राज्यांमध्ये जीएसटी कर उत्पन्न ९० टक्क्यांनी कमी झाले होते. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, पंजाब , आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांच्या तिजोरीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे केंद्र सरकारने जीएसटी भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या राज्यांनी केली होती.