बिबट्याच्या जबड्यातून आईने मुलीला सोडवले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
11 May :- 3 वर्षांची मुलगी आपल्या घराबाहेर बसून जेवत होती. तेवढ्यात एका बिबट्याने तेथे येत मुलीला जबड्यात पकडले. त्यानंतर ताबडतोब मुलीला घेऊन तो पुन्हा जंगलात जाणारच तेवढ्यात मुलीच्या आईची नजर त्याच्याकडे गेली. तिने क्षणाचाही विचार न करता बिबट्यावर झडप घातली. फक्त काठीने या आईने बिबट्यावर हल्ला चढवला व मुलीला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले.ज्योती पुपलवार, असे या धाडसी आईचे नाव आहे.
बिबट्याच्या या हल्ल्यात मुलीचा जीव वाचला. मात्र, ती जखमी झाली असून तिच्यावर चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागानेदेखील या घटनेची दखल घेतली आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी बिबट्याला ठार मारण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी गावात आलेल्या वनविभागाच्या 10 अधिकाऱ्यांनाच ग्रामस्थांनी ओलीस ठेवले होते. चंद्रपूर येथील दुर्गापूर गावात मंगळवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली.
काठीने हल्ला केल्यानंतर बिबट्याने मुलीला सोडले. मात्र, त्यानंतर त्याने आई ज्योती पुपलवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्योती डगमगल्या नाहीत. त्यांनी काठीने बिबट्यावर अनेक वार केले. अखेर आईची आक्रमक वृत्ती पाहून बिबट्याला हार पत्करावी लागली आणि त्याने तेथून पळ काढला.घटनेबाबत ज्योती पुप्पलवार यांनी सांगितले की, ‘माझी मुलगी घराच्या अंगणात जेवण करत होती आणि मी आंघोळीसाठी गेले होते.
अंघोळ करून बाहेर येताच बिबट्या माझ्या मुलीला ओढून नेत असल्याचे पाहिले. काहीही विचार न करता मी त्याच्यावर काठीने हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने मुलीला सोडून दिले. पण तो पुन्हा हल्ला करणार होता. मी त्याला सतत काठीने मारल्याने तो पळून गेला.’चंद्रपूरच्या दुर्गापूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही पहिली घटना नाही. गेल्या महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन वृद्ध आणि दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे या भागात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 6 लहान मुलांचा समावेश आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बिबट्याला मारण्याची मागणी केली. वनविभागानेही रात्री उशिरा बिबट्याला मारण्याचे आदेश दिले आहेत. आता बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे शोधमोहीम राबविण्यात येत आहे.