देश विदेश

लंकेत हिंसाचार! खासदाराचा मृत्यू, मंत्र्याचे घर जाळले; PM चा राजीनामा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 May :- कमालीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजधानी कोलंबोसह देशाच्या अनेक भागांत सरकार समर्थक व विरोधकांत हिंसक संघर्ष उफाळला आहे. त्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ति अथुकोरला यांचा मृत्यू झाला आहे.

जमावाने माजी मंत्री जॉन्स्टन फर्नांडो यांच्या माउंट लॅव्हिनिया भागातील आलिशान घर पेटवून दिले आहे. त्यात त्यांचे कुटूंब थोडक्यात बचावलेत. हिंसक जमावाने अन्य एक खासदार सनथ निशांथा यांच्या घरावरही जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे.

गत आठवड्यात प्रमुख विरोधी पक्षनेते सिरिसेना यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेतली होती. त्यात पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लंकेत अंतरिम सरकार स्थापन होईल. पण, तत्पूर्वी देशात शांतता प्रस्थापित करावी लागेल.

सरकारमध्ये सध्या राजपक्षे कुटूंबाचा दबदबा आहे. हे घराणे सरकारमध्ये विरोधकांचा समावेश करुन आपल्या अपयशाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याच्या प्रयत्नांत आहे. याऊलट देश वाचवण्यासाठी विरोधकही सरकार व विशेषतः राष्ट्रपती गोटाबाया यांची साथ देण्यास तयार असल्यामुळे लंकेत लवकरच अंतरिम सरकार दिसून येईल.

श्रीलंकेच्या अनेक भागांत पोलिस व निदर्शकांत हिंसक चकमकी सुरू आहेत. त्यातच महिंदा यांच्या राजीनाम्यामुळे स्थिती अधिकच बिकट बनली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा महिंदा यांचे मोठे बंधू गोटाबाया राजपक्षे यांची महिंदा यांचा राजीनामा घेण्याची इच्छा नव्हती. पण, विरोधकांच्या मागणीपुढे त्यांना झुकावे लागले. आता राजपक्षे यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांच्या समर्थकांत मोठी राडेबाजी सुरू झाली आहे.