मराठवाडा

विद्यार्थ्याला कपडे काढून मारहाण

9 May :- जुन्या वादातून अकरावीत शिकणाऱ्या तरुणाला दहा जणांच्या टोळक्याने दोन ठिकाणी नेत कपडे काढून बेदम मारहाण केली. यात त्याच्या कान, नाकातून रक्त निघाले. डोक्याला गंभीर इजा झाली. एका कानाने कमी ऐकायला येऊ लागले. मारहाण करणाऱ्यांनी एवढ्यावरच न थांबता त्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत धमक्या दिल्या. पुंडलिकनगरनंतर आता औरंगाबाद शहराच्या अन्य भागांत गुंडगिरीच्या अशा घटना वाढू लागल्या आहेत.

धक्कादायक म्हणजे, टवाळखोरांमध्ये बहुतांश १७ ते २५ वयोगटातील आहेत. मारहाणीचे स्टेटस ठेवताना ते एखाद्या गेममधील लेव्हलप्रमाणे विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहेत. बेमपुऱ्यातील दत्तात्रय कोकणे हे खासगी वाहनचालक असून त्यांचा मुलगा प्रज्वल स.भु. महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिकतो. सध्या महाविद्यालय बंद असल्याने त्याने त्याच परिसरात ट्यूशन लावली आहे.

३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता ट्यूशनच्या खाली काही टवाळखोरांनी त्याला मारहाण सुरू केली. हा प्रकार शिक्षकांना कळताच त्यांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. काही वेळानंतर टवाळखोरांनी त्याला दुचाकीवर बसवून मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर नेले. तेथे दहा जणांनी दुपारी साडेबारापर्यंत मारहाण केली. त्यात त्याच्या डोके, कान, नाकाला गंभीर इजा झाली.