महाराष्ट्र

राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना; PM मोदी, गृहमंत्र्यांकडे करणार CM ठाकरेंची तक्रार

9 May :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दिल्लीला रवाना होण्यासाठी मुंबईहून निघाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पोलिस व तुरुंग प्रशासनाने महिला खासदाराला जी वागणूक दिली, त्याची तक्रार आम्ही दिल्लीत करणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे. यावेळी नवनीत राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

हनुमान चालिसाचा आग्रह केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गुंडांनी आमच्या मुंबई व अमरावतीतील घरांवर हल्ला केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्हाला 20 फूट गाडण्याची भाषा केली. त्यासाठी स्मशानभूमीत सामान पोहोचवल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.

महाराष्ट्रात तुरुंगात जाणारी मी पहिली महिला खासदार आहे. तुरुंगात प्रत्येकाला कैद्याप्रमाणेच वागणुक दिली जाते, हे मला मान्य आहे. मात्र, त्याबाबतही काही नियम आहे. मला तुरुंग प्रशासनाने जाणूनबुजून हिन वागणूक दिली. तुरुंगात माझा छळ करण्यात आला. माझी तब्येत बिघडल्यानंतरही योग्य उपचार दिले गेले नाही.

माझी तब्येत बिघडल्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासाठी जाणूनबुजून उशीर करण्यात आला. हे सर्व उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरच करण्यात आले. अहंकारी मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर अन्याय केला, असा आरोप करत या सर्व बाबींची माहिती आपण दिल्लीत देणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.