महाराष्ट्र

रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 May :- ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. महापालिका निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना उत्तर देईल. राम, हनुमानाचा विरोध केल्याची शिक्षा निवडणुकीत त्यांना मिळेल. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. नवनीत राणा यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

नवनीत राणा पती रवी राणा यांच्यासोबत ‘लिलावती’च्या बाहेर आल्या. रुग्णालयाच्या बाहेर येताच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी औक्षण करत नवनीत राणांचे स्वागत केले. यावेळी नवनीत राणांच्या हातात हनुमान चालिसाची पुस्तिकाही होती. समर्थकांकडून नवनीत राणांना हनुमानाची मूर्ती देखील देण्यात आली. रुग्णालयाच्या बाहेर येताच ‘हनुमान चालिसा म्हणणं हा गुन्हा आहे का?’ असा सवाल करत नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लिलावती रुग्णालयाबाहेर राणा यांच्या सर्मथकांनी श्रीरामाचे नाव असलेली शाल पांघरून नवनीत राणांचे स्वागत केले आहे. त्यानंतर राणांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “मी कोणता गुन्हा केला, ज्याची मला शिक्षा देण्यात आली? हनुमान चालिसा वाचणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस काय 14 वर्षे शिक्षा भोगण्यास तयार आहे.”

दरम्यान, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना मानेचा त्रास जाणवत असल्याने त्यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी 11 वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यापुढे देखील माझा लढा हा सुरूच राहणार आहे. माझ्यावर कारागृहात जो अत्याचार झाला त्याबद्दल मी लवकरच बोलेन, आम्ही कारवाईला घाबरणार नाहीत. कारागृहात मिळालेल्या वागणुकीमुळे मला मानसिक त्रास झाला असल्याचेही नवनीत राणा म्हणाल्या.